#महिला_उद्योजिका :२
#jfw Joshi Food Works
केतकी जोशी
प्रत्येक स्त्रीमध्ये उद्योगासाठी आवश्यक असलेले गुण हे मूलतःच असतात. गरज असते ती आपली शक्यता ओळखून त्या दिशेने पाऊलं उचलायची. बऱ्याच जणींना हे जमत नाही. पण काही जणी मात्र आलेल्या अडचणींवर मात करत आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल उचलतात आणि यशस्वी देखील होतात, आज आपण अशाच एका उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत. जिने संसारिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून झाल्यावर आपली सेकंद इनिंग चालू केली आणि आज ती एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलीय.
केतकी जोशी आणि तिचे पती दोघेही इंजिनियर. आनंदी सुखवस्तू कुटुंब. राजाराणी चा संसार अगदी व्यवस्थित चालू असताना चाहूल लागली एका नवीन पाहुण्याची आणि मग मुलीच्या जन्मानंतर केतकी ताईंनी मुलीला सांभाळण्यासाठी नोकरी सोडली आणि गृहिणीपद स्वीकारलं.
मुलगी शाळेत जायला लागल्यानंतर मात्र केतकी ताईंना आयडेंटिटी क्राईसेस सुरू झाले. मी कोण, माझं अस्तित्व काय, माझ्या शिक्षणाचा उपयोग काय? असे अनेक प्रश्न त्यांना शांत बसू देईनात. शेवटी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा ठरवला. पण व्यवसाय करायचा तर कोणता करायचा? कोणताही अनुभव नव्हता आणि कुटुंबाला देखील उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती. अशा वेळी काय करायचं हा मोठा प्रश्न ताईंसमोर होता. पण केतकी ताईंना फूड मध्ये खूप आवड असल्याने त्यांनी याचंच रूपांतर व्यवसायात करायचं ठरवलं आणि त्यांनी 'जोशी फूड वर्क'(JFW) नावाने व्यवसाय सुरू केला.
आपल्या छंदाचं, कलेचं रूपांतर आपण जेंव्हा व्यवसायात करतो; तेंव्हा ते आपण जास्त मन लावून करतो आणि म्हणूनच आपली प्रगती खूप वेगाने होते. आई, सासूबाई आणि कामाला येणाऱ्या दोन महिलांना घेऊन केतकी ताईंनी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, पिठं बनवायला सुरुवात केली. घरगुती चवीचे हे पदार्थ लोकांना आवडायला लागले आणि हळूहळू ताईंचा गृहउद्योग देखील वाढायला लागला. फक्त पुण्यापर्यंत न राहता महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात देखील JFW चे प्रॉडक्ट्स पोहोचलेत.
फक्त पदार्थ बनवून उपयोग नाही, ते जास्त काळ कसे टिकवायचे, मार्केटिंग कसं करायचं याचं देखील ज्ञान आवश्यक असल्याने यांनी अनेक ठिकाणी प्रशिक्षण घेतले. फूड प्रोसेसिंग, मसाला मेकिंग- प्रोसेसिंग यांसारखे प्रशिक्षण MCD आणि उद्योगवर्धिनी अंतर्गत घेतले आणि आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
सध्या त्यांच्याकडे ८ महिला काम करतात. महिलांना रोजगार मिळावा या दृष्टीने केतकी ताई फक्त महिलांनाच काम देतात, शिवाय JFW चे सर्व प्रॉडक्ट महिलांना रिसेलिंग साठी देखील दिले जातात. यामुळे कित्येक महिलांना काम मिळालं आहे. गोवा, मालवण किंव्हा इतर महाराष्ट्रीयन ज्या उद्योजिका आहेत, त्यांच्या प्रॉडक्ट्सना मार्केट मिळवून देण्याचं काम देखील केतकी ताई करतात.
मसाले, चटण्या, वेगवेगळीं पिठं बनवण्यासाठी लागणारे मशिन्स आणि मिक्सर्स देखील त्यांनी खरेदी केले आहेत, त्यामुळे ग्राहकांची मागण्या त्या वेळेवर पूर्ण करू शकतात. सध्या पुण्यातच त्यांनी जमीन खरेदी केली आहे, भविष्यात तिथे खूप मोठा उद्योग उभारायचा त्यांचा मानस आहे. या क्षेत्रांमध्ये त्यांना अनेक स्पर्धक देखील आहे, याविषयी त्यांना विचारलं असता, त्या म्हणतात की, स्पर्धक जेवढे जास्त, तेवढी आपली प्रगती जास्त होते, कारण आपण आपल्या प्रॉडक्ट शी कधीच तडजोड करत नाही.
उद्योगाचा उद्देश नफा हा असला तरीही केतकी ताई मात्र तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता जास्तीत जास्त महिलांना काम कसं देता येईल यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. शिवाय त्या सामाजिक बांधिलकी देखील मानतात. त्यामुळे त्या अनेक सेवाभावी संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि उपेक्षित महिलांना मदत व्हावी यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.
JFW चे प्रॉडक्ट्स महाराष्ट्रसोबतच इतर राज्यांत व परदेशी पोहोचवावेत, हे त्यांचं ध्येयं आहे आणि यामुळेच त्या झेप शी तीन वर्षांपूर्वी जोडल्या गेल्या. तेथील सगळ्या उद्योगिणींची इतर महिलांना मदत करण्याची तळमळ पाहून केतकी ताई खूप प्रभावित झाल्या व त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून त्या काम करत आहेत.
केतकी ताई आणि JFW च्या पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा...!
Comments
Post a Comment